छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : उन्हाळ्याच्या तोंडावर शहराला सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अडचणी जाणून घेत गॅप कमी करण्यासाठी नवनियुक्त महापौरांनी पावले उचालण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (दि.१७) पाणीपुरवठा विभागाची बैठक घेत गॅप कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा सविस्तर आराखडा २५ फेब्रुवारीपर्यंत सादर करा, असे आदेश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत.
पदभार घेतल्यानंतर दुसर्याच दिवशी त्यांनी चिकलठाणा ते सिडको पाणी वितरणातील अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर मंगळवारी त्यांनी अधिकार्यांची बैठक घेत, शहराचा पाणी प्रश्न जाणून घेतला. बैठकीस महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त जी. श्रीकांत, पाणीपुरवठा विभागाचे समन्वयक ए. बी. देशमुख, के. एम. फालक, कार्यकारी अभियंता वसंत भोये, अनिल तनपुरे, किरण धांडे आदींसह अधिकारी उपस्थित होते. अनेक भागाला आठ दिवसाआड तर काही भागाला दहा ते बारा दिवसाआड पाणी मिळत आहे. उन्हाळयात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, त्यामुळे आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. अधिकार्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन काम करावे, अडचणी न सांगता त्यावरील उपाय सांगा, पाण्याचा गॅप कमी करण्याच्या दृष्टीने काय काय उपायोजना करता येतील, याचा सविस्तर आराखडा तयार करून २५ फेब्रुवारीपर्यंत सादर करा, असे आदेश महापौरांनी दिले.














